२३ जाने, २००९

पाककृती

1. सुक्या बोंबिलाची भुर्जी :

३ मोठे कांदे, २ मोठे टोमॅटो, ३-४ हिरव्या मिरच्या, ४-५ सुके बोंबिल, लाल तिखट, हळद, मीठ, आल-लसूण पेस्ट, कोथिंबीरकांदे-टोमॅटो बारीक कापून घ्यावे. बोंबिल बारीक तुकडे करून १० मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावे. तेलावर बोंबिल, आल-लसूण पेस्ट, हिरवी मिरची परतून घ्यावी. त्यात कांदा - टोमॅटो शिजवून घ्यावा. लाल तिखट, हळद आणि मीठ घालावे. शिजल्यावर वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी

पाककृती

तळलेला बोंबिल :

बोंबिल साफ करून प्रत्येकी ३ तुकडे करावे. नंतर प्रत्येक तुकडा मध्ये चिरावा, पण पूर्ण कापू नये. मधल्या कट्यापर्यन्त कापून ओपन करावा. त्याला मीठ, हळद, आल-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, थोडी लाल मिरची पूड, लिंबाचा रस लावून १० मिनिटे ठेवावे. नंतर रवा किंवा तांदळाच्या पिठात घोळवून थोड्या तेलात फ्राय करावे.
ही कृती ओल्या आणि सुकया दोन्ही साठी चालते. सुके बोंबिल पाण्यात १० मिनिटे भिजवून, थोडे ठेचून मग त्याला मसला लावावा आणी तळावे.

ओल्या बोंबलाच कालवण

४-५ ओले बो॑बील, १/२ नारळ किसलेला, २ इंचा आल, १०-१२ पाकळ्या लसुण, कोथिंबीर १ छोटी जुडी , ४ हिरव्या तिखट मिरच्या, आवळ्या एवढ्या चिंचेचा कोळ, १ छोटा चमचा हळद, २ छोटे चमचे मालवणी मसालानारळ, आल, लसुण, कोथिंबीर आणि मिरच्या वाटून घ्याव्या. बो॑बील साफ करून प्रत्येकी ३ तुकडे करून घ्यावेत. त्यात ३-४ मोठे चमचे तेल, वाटलेला मसाला, चिंचेचा कोळ, मीठ आणि २ चमचे मालवणी मसाला सगळा एकत्र लावून ५ मिनिटे ठेवावे. नंतर दाट कलवण होईल इतके पाणी ठेवून चांगली उकळी आणावी. ५ मिनिटापेक्षा जास्त उकळवु नये. गरम भाकरी बरोबर खूप छान लागते.याच कालवणात हिरवी भोपळी मिरची सुद्धा छान लागते.

माझा गाव

मनकोन्यात दडलय गाव
सागरलाटांवर डुलतेय नाव

माडांच्या पानात
सुरुच्या रानात
वार्‍याची गाणी
घुमती कानात
देवळाच्या घंटेत श्रद्धाभाव
सागरलाटांवर डुलतेय नाव


पाउलवाटेवर
धुळीशी कुस्ती
बैलगाडीतील
मित्रांशी मस्ती
पावसाच्या सरीत भिजलाय गाव
सागरलाटांवर डुलतेय नाव

चमचमत्या वाळूत
ओलीशी पावल
आबांच्या राईत
आभाळ मावल
आजीची हाक घेते काळजाचा ठाव
सागरलाटांवर डुलतेय नाव

कांदा-कोलंबी-कैरीच कालवण

२ मोठे कांदे उभे चिरून घ्यावे. १ मोठी कैरी सोलून उभ्या चिरा करून घ्याव्या. २ वाट्या कोलंबी सोलून घ्यावी. छोटे ३-४ चमचे लसूण-आले -हिरवि मिरचि पेस्ट करून घ्यावी. भांड्यात २ मोठे चमचे तेल गरम करून घ्यावे. तेलात आल-लसूण पेस्ट टाकून कोलंबी टाकावी. कोलंबी लालसर झाली की चिरलेले कांदे टाकून अर्धवट गुलाबी परतून घ्यावे. नंतर त्यात कैरी टाकून थोडे पाणी टाकावे. थोडी लाल मिरची पावडर, मालवणी मसाला असेल तर १ चमचा आणि थोडे मीठ टाकावे. एक चांगली उकळी आणून कैरी शीजली की बंद करावे. गरम भाताबरोबर झकास लागते.

अळु-वालाची आंबट गोड रसभाजी

साहित्य - ३ वाट्या सोललेले वाल, ६-७ काड्या भाजीच अळु बारीक चिरलेल, १ बारीक चिरलेला छोटा कांदा , तेल, मीठ, गुळ, चिंच
मसाला - ४ पाकळ्या लसूण, १ काडी दालचिनी, ३ हिरव्या मिरच्याकृती - पातेल्यात ३ मोठे चमचे तेल गरम करून त्यात कांदा गुलाबी होईपर्यंत परता. कांदा शिजल्यावर अळु-वाल घालून चांगली वाफ आणावी. वाल शिजत आले की मीठ आणि वाटलेला मसाला घालावा. बोराएवढ्या चिंचेचा कोळ घालावा. थोडे पाणी घालावे. एक चांगली उकळी आणून त्यात थोडा गुळ घालावा. मंद आचेवर ५ मिनिट शिजवावे. ही भाजी आपल्या आवडी प्रमाणाने गोड तिखट आंबट करता येते. वरुन कोथिंबीर पेरावी.